खा. निलेश लंकेची केंद्र सरकारकडे मागणी

अहिल्यानगर (प्रतिनिधी)-
अहिल्यानगर जिल्ह्यातील सुपा येथे स्वतंत्र ग्रीनफिल्ड विमानतळ उभारण्याची मागणी खासदार डॉ. नीलेश लंके यांनी केंद्र सरकारकडे केली आहे. (अहिल्यानगर नवीन विमानतळ प्रस्ताव ) नागरी उड्डयन मंत्री किंजारापू नायडू यांना दिलेल्या निवेदनात त्यांनी औद्योगिक, पर्यटन, संरक्षण व कृषी क्षेत्राला नवा वेग देण्यासाठी ही सुविधा अत्यावश्यक असल्याचे नमूद केले आहे. तात्काळ विमानतळ उभारणी शक्य नसल्यास शिर्डी विमानतळाचा विस्तार करून सुपा परिसराशी जोडणी करण्याचाही प्रस्ताव त्यांनी मांडला आहे. Ahilyanagar New Airport Proposal

खा. लंके यांनी सांगितले की, सुपा, रांजणगाव, कारेगाव औद्योगिक वसाहतींमध्ये अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय कंपन्यांची गुंतवणूक आहे. मात्र विमान सेवा उपलब्ध नसल्याने दळणवळण, लॉजिस्टिक्स, निर्यात आणि वेळेचे नियोजन यामध्ये उद्योगांना अडचणी येतात. विमानतळाची सुविधा निर्माण झाल्यास हा परिसर एक मोठा औद्योगिक क्लस्टर बनू शकतो, गुंतवणूकदारांचा विश्वास वाढेल आणि स्थानिक रोजगार संधींनाही मोठा वेग मिळेल. (अहिल्यानगर नवीन विमानतळ प्रस्ताव )
अहिल्यानगर जिल्ह्यातील डाळिंब, द्राक्ष, ऊस, कांदा यांसारखी दर्जेदार कृषी उत्पादने थेट जागतिक बाजारपेठेत पोहोचवण्यासाठी विमानतळ मोठी मदत ठरेल. तसेच धार्मिक पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेल्या शिर्डी, शनि शिंगणापूर, अहिल्यानगर किल्ला, अष्टविनायक मंदिरे अशा ठिकाणी दरवर्षी देश-विदेशातून लाखो पर्यटक येतात. विमानतळामुळे त्यांच्या प्रवासात सुलभता येऊन पर्यटन व्यवसायाला चालना मिळेल. याशिवाय, जिल्ह्यातील आर्मर्ड कोर सेंटर व टँक फॅक्टरीच्या हालचालींनाही विमानतळामुळे गती मिळेल, असेही खा. लंके यांनी स्पष्ट केले.