दिल्ली हायकोर्टाने पलटवला कनिष्ठ न्यायालयाचा निकाल
नवी दिल्ली :
लग्नाचे खोटे आश्वासन देऊन केवळ शारीरिक संबंध प्रस्थापित करण्याच्या उद्देशाने दिलेले वचन हा बलात्काराच्या गुन्ह्यात मोडतो, असा महत्त्वपूर्ण निर्णय दिल्ली हायकोर्टाने दिला आहे. कनिष्ठ न्यायालयाने आरोपीस निर्दोष ठरविलेल्या निकालावर हायकोर्टाने उलटफेर केला असून आरोपीस दोषी ठरविण्यात आले आहे. ( लग्नाचे खोटे आश्वासन देऊन संबंध ठेवले तर )
जस्टिस स्वर्णकांत शर्मा यांच्या खंडपीठाने दुष्कर्म प्रकरणाची सुनावणी करताना स्पष्ट केले की, जर आरोपीला सुरुवातीपासूनच माहीत असेल की लग्न होणे अशक्य आहे आणि तरीदेखील खोटे वचन देत महिलेबरोबर शारीरिक संबंध ठेवले, तर तो बलात्काराचा गुन्हा ठरतो.
हा खटला अशा एका व्यक्तीशी संबंधित आहे ज्याने एका महिलेबरोबर दीर्घकाळ वारंवार शारीरिक संबंध ठेवले व प्रत्येकवेळी “लवकरच लग्न करेन” असे आश्वासन दिले. संबंधित प्रकरणात कनिष्ठ न्यायालयाने एफआयआर उशिरा दाखल झाला, तात्काळ तक्रार करण्यात आली नाही, वैद्यकीय पुरावेही नाहीत आणि कथित अश्लील व्हिडिओही जप्त झालेले नाहीत, या कारणांवरून आरोपीस निर्दोष ठरविले होते.
परंतु पीडितेचे म्हणणे होते की, आरोपीच्या सततच्या लग्नाच्या वचनांमुळे व अश्लील व्हिडिओंचा गैरवापर करण्याच्या धमकीमुळे काही काळ तिने संबंध टिकवून ठेवले. मात्र नंतर आरोपीने लग्न नाकारत सांगितले की त्याचे कुटुंब आंतरजातीय विवाहास परवानगी देणार नाही.
हायकोर्टाने निरीक्षण नोंदवले की, आरोपीला सुरुवातीपासूनच पीडितेची जात माहीत होती. अशा परिस्थितीत नंतर जातभेद हा कारण म्हणून सांगणे भ्रामक आहे. सुरुवातीपासूनच लग्नाचा त्याचा हेतू नसल्याचे यावरून स्पष्ट होते. तसेच अशा प्रकारच्या प्रकरणांत उशिराने तक्रार दाखल होणे हे धमक्या, भीती आणि सामाजिक कलंकामुळे घडते, त्याकडे दुर्लक्ष करता येणार नाही, असे खंडपीठाने नमूद केले.