आमदार लहामटे व डॉ. जयश्री थोरातांची तातडीने उपाययोजना करण्याची मागणी
संगमनेर (प्रतिनिधी) : ( घुलेवाडी वस्तीगृह आंदोलन )
घुलेवाडी येथील शासकीय आदिवासी वस्तीगृहातील अपुऱ्या सुविधा आणि दुरावस्थेच्या मुद्द्यावरून गेल्या दोन दिवसांपासून सुमारे 250 विद्यार्थी उपोषणावर बसले आहेत. अन्नत्याग उपोषण तीव्र झाल्याने काही विद्यार्थ्यांची तब्येत खालावली असून त्यांना तातडीने रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र रुग्णालयात असूनही विद्यार्थ्यांनी आपला संघर्ष सोडण्यास नकार दिला आहे.
विद्यार्थ्यांनी इमारतीची रंगरंगोटी, प्रवेशक्षमता वाढविणे, नवीन इमारत, प्रवास खर्च, संगणक, स्टडी रूम, वीज दुरुस्ती, गरम पाण्याची व्यवस्था, स्वच्छता कर्मचाऱ्यांची संख्या वाढविणे, ग्रंथालयातील पुस्तके, व्यायामशाळा इ. मागण्या केल्या आहेत.
यावेळी आमदार डॉ. किरण लहामटे आणि डॉ. जयश्री थोरात यांनी वस्तीगृहाला भेट देत विद्यार्थ्यांशी संवाद साधला. यावेळी संगमनेर तालुका काँग्रेसचे अध्यक्ष अजय फटांगरे, आदिवासी विभागाचे अध्यक्ष बाळकृष्ण गांडाळ, प्रकल्प अधिकारी देवकन्या बोडके आदी उपस्थित होते. डॉ. जयश्री थोरात म्हणाल्या की, घुलेवाडी शासकीय वस्तीगृहातील दुरावस्था आणि अपुऱ्या सोयींमुळे आंदोलन सुरू केलेल्या आदिवासी विद्यार्थ्यांच्या सर्व मागण्या तातडीने सोडवल्या पाहिजेत, विद्यार्थ्यांना सर्व सुविधा तातडीने उपलब्ध झाल्याच पाहिजेत. हा त्यांचा हक्क आहे. ( घुलेवाडी वस्तीगृह आंदोलन batmibuzz news) माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या संकल्पनेतून हे वस्तीगृह उभे राहिले होते, ते विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी नेहमीच जातीने लक्ष घालत होते. मात्र सरकार बदलल्यानंतर प्रशासनाने याकडे सपशेल दुर्लक्ष केले असून आज विद्यार्थ्यांना उपोषण करावे लागत आहे.
विद्यार्थ्यांनी व्यवस्थित जेवण वस्तीगृहासाठी रंगरंगोटी व्हावी, प्रवेश क्षमता वाढवून नवीन इमारत उभी करावी, ५ किमीपेक्षा जास्त अंतरावरून येणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रवास खर्च मिळावा, नवीन संगणक व अद्यावत स्टडी रूम उपलब्ध व्हावी, लाईटची दुरुस्ती करून गरम पाण्याची सोय करावी, स्वच्छता कर्मचाऱ्यांची संख्या वाढवावी, ग्रंथालयातील पुस्तकांची वाढ करावी तसेच व्यायामशाळा आणि क्रीडासुविधा निर्माण कराव्यात अशा मागण्या केल्या आहेत. यातील बहुतांश मागण्या या अजूनही पूर्ण झालेल्या नाहीत. तर आता फक्त आश्वासन नकोय, प्रत्यक्ष कृती हवी आहे. विद्यार्थ्यांच्या मागण्या पूर्ण होईपर्यंत आम्ही स्वस्थ बसणार नाही.
आमदार डॉ. किरण लहामटे म्हणाले की, “शिक्षण अत्यंत महत्त्वाचे असून विद्यार्थ्यांना कोणत्याही प्रकारची गैरसोय सहन करावी लागणार नाही. वस्तीगृहाची क्षमता वाढवून घ्या, आवश्यक असल्यास जवळपास इमारत शोधून विद्यार्थ्यांची व्यवस्था करा. विद्यार्थ्यांचा अभ्यासाचा वेळ वाया जात आहे याची जबाबदारी प्रकल्प कार्यालयाने स्वीकारली पाहिजे. मागण्या तातडीने पूर्ण कराव्यात.”
संगमनेर व अकोले तालुक्यातील अनेक आदिवासी विद्यार्थ्यांसाठी घुलेवाडी वस्तीगृह हे मोठे आधारस्थान आहे. मात्र निधीअभावी त्याची दुरवस्था झाल्याने विद्यार्थ्यांना आता थेट उपोषणाचा मार्ग स्वीकारावा लागला आहे. प्रशासनाने मागण्या पूर्ण करा नाहीतर खुर्च्या खाली करा हि ठाम भूमिका आता विद्यार्थ्यांनी घेतली आहे.