
राज्यभरात हिंदी सक्ती आणि त्रिभाषा सूत्रावरून सुरू झालेल्या वादाला मोठी कलाटणी मिळाली आहे. (हिंदी सक्ती रद्द) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत जाहीर केलं की, हिंदी सक्तीबाबतचे दोन्ही शासन निर्णय रद्द करण्यात आले आहेत. महाराष्ट्र मंत्रिमंडळाच्या बैठकीत 16 एप्रिल 2025 आणि 17 जून 2025 चे शासन निर्णय रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयानंतर शिक्षण तज्ज्ञ डॉक्टर नरेंद्र जाधव यांच्या अध्यक्षतेखाली नवीन समिती नेमण्यात येणार असून, त्रिभाषा सूत्राचा सविस्तर अभ्यास करून विद्यार्थ्यांच्या हिताचा निर्णय घेतला जाणार आहे.

मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितलं की, आम्हाला कोणत्याही प्रकारचं राजकारण करायचं नाही. आमची नीती नेहमी विद्यार्थी केंद्रित राहील आणि मराठी विद्यार्थ्यांना प्राधान्य देणारी असेल. त्यांनी पत्रकार परिषदेत माशेलकर समितीचा अहवालही दाखवला ज्यावर तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची सही होती. या अहवालात पहिली ते बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी इंग्रजी व हिंदी ही दुसरी भाषा म्हणून सक्ती करण्याची शिफारस करण्यात आली होती. याच अहवालावर पुढे अंमलबजावणी समिती नेमण्यात आली आणि त्यावरून शासन निर्णय जारी झाले होते.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, काल आम्ही हिंदी विषय ऑप्शनल केला (हिंदी सक्ती रद्द) आणि कोणतीही भारतीय भाषा तिसरी भाषा म्हणून निवडता येईल असा निर्णय घेतला होता. मात्र, काहीजण झोपेचं सोंग घेत असल्याने त्यांना जागं करणं कठीण गेलं. विरोधी पक्षाने चहापानावर बहिष्कार टाकताना मोठं पत्र दिलं होतं, पण त्यात जुने मुद्देच मांडले होते.
ठाकरेंची भाजपवर जोरदार टीका –
दरम्यान, उद्धव ठाकरे यांनी भाजपवर जोरदार टीका केली. त्यांनी म्हटलं की, भाजपचा खोटं पसरवण्याचा उद्योग आहे. मराठी आणि अमराठी माणसात फूट पाडून मतं खेचण्याचा छुपा अजेंडा त्यांनी आखला होता, पण मराठी माणसाने समंजस भूमिका घेतल्याने हा डाव फसला. ठाकरे म्हणाले, सक्ती मागे घ्यायला लावली आहे. 5 जुलैला जो मोर्चा सक्तीच्या विरोधात निघणार होता, तो आता विजयाचा मोर्चा व जल्लोष सभा म्हणून घेतला जाईल. कुठे सभा घ्यायची, हे दोन दिवसात सर्वांशी चर्चा करून ठरवू.

ठाकरे यांनी स्पष्ट केलं की, कोणतीही समिती नेमली तरी सक्तीला आम्ही विरोधच करणार आहोत आणि ती कधीच होऊ देणार नाही. भाजपला या प्रश्नावरून चपराक बसली आहे. यानंतरच्या काळातही मराठी माणसाने जागरूक राहावं, असं आवाहन त्यांनी केलं.