
तोडफोड व गोळीबाराने परिसरात खळबळ
अहिल्यानगर (प्रतिनिधी)-
अहिल्यानगर जिल्ह्यातील जामखेड-बीड रस्त्यालगत असलेल्या हॉटेल कावेरी येथे बुधवारी मध्यरात्रीच्या सुमारास थरारक घटना घडली आहे. काही अज्ञात टोळक्याने हॉटेल कावेरीवर हल्लाz हल्ला चढवत मोठ्या प्रमाणात तोडफोड केली असून यावेळी झालेल्या गोळीबारात हॉटेल मालक रोहीत अनिल पवार (वय २७) गंभीर जखमी झाले आहेत. (जामखेड-बीड रस्त्यावर मध्यरात्री गोळीबार, हॉटेल कावेरीवर हल्ला)
मिळालेल्या माहितीनुसार, रात्री सुमारे बारा वाजता रोहीत पवार हे हॉटेलमध्ये ग्राहकांना सेवा देत असताना सात ते आठ जणांची टोळी अचानक हॉटेलमध्ये घुसली. यानंतर त्यांनी हॉटेलमधील साहित्याची तोडफोड करत रोहीत पवार यांच्यावर गोळीबार केला. गोळी त्यांच्या पायाच्या पिंढरीतून आरपार गेल्याने ते गंभीर जखमी झाले.
हल्ल्यानंतर आरोपींनी हॉटेल मालकाच्या चारचाकी वाहनाचीही तोडफोड केली असून वाहनाचे मोठे नुकसान झाले आहे. घटना घडताच आरोपी घटनास्थळावरून पसार झाले. जखमी रोहीत पवार यांना तातडीने अहिल्यानगर येथील एका खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती आहे.
दरम्यान, पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली असता दोन संशयित आरोपी निष्पन्न झाले आहेत. मागील वादातूनच हा हल्ला आणि गोळीबार झाल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांकडून व्यक्त करण्यात येत आहे. घटनास्थळी अहिल्यानगर येथील फॉरेन्सिक पथक दाखल झाले असून तपासादरम्यान गावठी कट्ट्याचे अवशेष आढळून आले आहेत.
या प्रकरणी दोन संशयितांची नावे निष्पन्न झाली असून इतर आरोपींचा शोध घेण्याचे काम सुरू आहे. जामखेड पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. घटनेची माहिती मिळताच अतिरिक्त पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रविणचंद लोखंडे आणि पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.