
पोलिस होण्याचे स्वप्न अनेकांचे पूर्ण होणार आहे. राज्यात पोलिस दलात मेगा भरती राबवली जाणार असून, नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी ही मोठी संधी ठरणार आहे. मागील काही दिवसांपासून राज्यातील तरुण या भरतीची आतुरतेने वाट पाहत होते. आता शेवटी सरकारकडून याबाबत मोठा निर्णय घेण्यात आला आहे.गृहविभागाने महाराष्ट्र पोलिस दलात तब्बल 15,000 पदांच्या भरतीस मंजुरी दिली आहे. मंत्रिमंडळात या भरतीस हिरवा कंदील मिळाल्याने, पोलिस होण्याचे स्वप्न असलेल्या हजारो तरुणांचे स्वप्न साकार होण्याची शक्यता आहे. भरती प्रक्रियेबद्दलची अधिकृत माहिती लवकरच प्रसिद्ध होणार असून, अर्ज करण्याची तारीख व इतर सर्व टप्प्यांची घोषणा निकट भविष्यात केली जाईल.अनेक दिवसांपासून उमेदवारांनी भरतीसाठी सराव सुरू ठेवला होता. मात्र, अधिकृत घोषणा न झाल्याने सर्वजण संभ्रमात होते. आता मात्र ही मेगा भरती होणार असल्याने तरुणांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.यंदाची भरती प्रक्रिया महापालिका निवडणुकांपूर्वी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. 15,000 पदांसाठी लाखोंच्या घरात अर्ज येण्याची अपेक्षा असून, ही राज्यातील आतापर्यंतच्या मोठ्या भरतींपैकी एक मानली जात आहे.
अन्न व नागरी पुरवठा विभागांतर्गत राज्यातील रास्त भाव दुकानदारांच्या मार्जिनमध्ये वाढ करण्याचा, तसेच सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत शिधापत्रिकाधारकांना अन्नधान्य वितरण सुरू ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. विमानचालन विभागांतर्गत सोलापूर–पुणे–मुंबई हवाई प्रवासाकरिता निधी उपलब्ध करून देण्याचे ठरले. सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या अखत्यारीत महामंडळांमार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध कर्ज योजनांतील जामीनदाराच्या अटी शिथिल करण्यात आल्या, तसेच शासन हमीस पाच वर्षांची मुदतवाढ देण्यात आली. गृह विभागांतर्गत महाराष्ट्र पोलिस दलात सुमारे १५ हजार पोलिस भरतीस मंजुरी देण्यात आली.
पोलीस भरतीची स्वप्ने पाहणाऱ्या इच्छुक उमेदवारांनी आत्तापासूनच सज्ज व्हायला हवे. शारीरिक चाचणी, लेखी परीक्षा आणि मुलाखत या तिन्ही टप्प्यांसाठी सखोल तयारी करणे गरजेचे आहे. भरतीची अधिकृत जाहिरात प्रसिद्ध झाल्यानंतर पात्रता निकष, आवश्यक कागदपत्रे आणि अर्ज प्रक्रिया नीट तपासावी. मंत्रिमंडळाची मंजुरी मिळाल्याने भरती प्रक्रिया लवकरच सुरू होणार आहे.