रेल्वे व द्रुतगती मार्गालाही गती हवी – आ. सत्यजित तांबे
अहिल्यानगर (प्रतिनिधी) पुणे – नाशिक हा मार्ग ( pune nashik highway ) केवळ दोन शहरांना जोडणारा दुवा नसून, महाराष्ट्र आणि देशाच्या अर्थकारणाला वेग देणारा महत्त्वाचा मार्ग आहे. पुणे–नाशिक–मुंबई ( pune nashik mumbai golden triangle ) हा “गोल्डन ट्रँगल” शेती, उद्योग, व्यापार आणि रोजगाराच्या प्रचंड संधी निर्माण करणारा पट्टा असून, येथे सक्षम वाहतूक व्यवस्था उभारणे ही काळाची गरज असल्याचे आमदार सत्यजित तांबे ( satyajeet tambe ) यांनी स्पष्ट केले. वाढत्या वाहतुकीमुळे नागरिक व उद्योगधंद्यांना भेडसावणाऱ्या अडचणींचा उल्लेख करत, नाशिक फाटा–राजगुरूनगर (खेड) या 30 किमी उन्नत महामार्ग प्रकल्पाला केंद्राने दिलेली गती स्वागतार्ह असल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली.
या प्रकल्पामुळे सध्या दीड ते दोन तास लागणारा प्रवास अवघ्या 30 मिनिटांत पूर्ण होईल. ( पुणे–नाशिक प्रवास होणार दोन तासांनी कमी ) भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाकडून (एनएचएआय) ( NHAI ) या प्रकल्पासाठी निविदा प्रक्रिया सुरू असून, 25 सप्टेंबर रोजी निविदा खुल्या करण्यात येणार आहेत. या कामासाठी सुमारे १४ हेक्टर जमीन संपादित करावी लागणार आहे. प्रस्तावित मार्गिका प्रामुख्याने ‘पीएमआरडीए’च्या ( PMRDA ) हद्दीत येते. मुख्यमंत्री स्तरावर झालेल्या बैठकीत ऑक्टोबरपूर्वी भूसंपादन पूर्ण करण्याचे आश्वासन देण्यात आले. मात्र, 80 टक्के भूसंपादन पूर्ण झाल्याशिवाय प्रत्यक्ष काम सुरू करता येणार नाही, असे एनएचएआयने स्पष्ट केले आहे. या कामासाठी पीएमआरडीए क्षेत्रातील सुमारे १५० जमीनमालकांकडून एकूण ९.७४ हेक्टर जमीन संपादित होणार आहे. नाणेकरवडी, वाकी खुर्द, वाकी बुद्रुक, चिंबळी, कुरुळी, मेदनकरवाडी आणि चाकण परिसरातील जमीन यात समाविष्ट आहे.
पिंपरी–चिंचवड महापालिका हद्दीत भोसरी व मोशी परिसरातही भूसंपादन करावं लागणार आहे. महापालिकेने बहुतांश जमीन आधीच TDR आणि FSI च्या बदल्यात संपादित केली असून, उर्वरित जमिनीच्या संपादनासाठी राज्य सरकारकडे निधी मागण्यात आला आहे. या मार्गिकेसाठी १० प्रवेश आणि निर्गमनमार्ग असतील. प्रकल्पाची एकूण लांबी ३० किलोमीटर असून, १४ हेक्टर जमिनीचे संपादन आवश्यक आहे. निविदा प्रक्रियेची अंतिम तारीख २५ सप्टेंबर निश्चित करण्यात आली आहे.
या प्रकल्पासोबतच पुणे–नाशिक रेल्वे ( pune nashik railway ) व औद्योगिक द्रुतगती मार्गाला गती मिळावी, असा ठाम पवित्रा आमदार सत्यजित तांबे यांनी घेतला आहे.
आमदार सत्यजित तांबे यांनी पुणे–नाशिक या महत्त्वाच्या पायाभूत प्रकल्पांना गती देण्याची मागणी केली आहे. या मार्गाने संपूर्ण प्रदेशाचा सर्वांगीण विकास होईल, असे त्यांचे मत आहे. पुणे–नाशिक रेल्वे हा प्रकल्प पूर्वनियोजित सरळ मार्गाने — सिन्नर, संगमनेर, आळेफाटा, नारायणगाव, मंचर, राजगुरूनगर, चाकण मार्गे व्हावा, अशी त्यांनी स्पष्ट भूमिका मांडली. शिर्डी–अहिल्यानगर मार्गे न नेता सरळ मार्ग निवडणेच योग्य ठरेल, असे त्यांनी अधोरेखित केले.
पुणे–नाशिक औद्योगिक द्रुतगती मार्गालाही गती मिळणे अत्यावश्यक असल्याचे तांबे यांनी सांगितले. या प्रकल्पांमुळे शेतकरी, उद्योगपती, कामगार, व्यावसायिक आणि सर्वसामान्य नागरिक यांचा मोठ्या प्रमाणावर फायदा होणार असल्याचे ते म्हणाले. प्रवास वेळेत होईल, उद्योग व रोजगाराच्या नवीन संधी उपलब्ध होतील आणि संपूर्ण पट्ट्याचे अर्थकारण वेगाने पुढे जाईल, असा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केला. “पुणे–नाशिक–मुंबई पट्ट्याचा विकास वेगवान व्हावा, वाहतूक व्यवस्था सक्षम व्हावी, उद्योगांना अनुकूल वातावरण मिळावे आणि नागरिकांचा वेळ व कष्ट वाचावेत, यासाठी मी सातत्याने शासनस्तरावर पाठपुरावा करीत आहे आणि तो यापुढेही जोमाने सुरू राहील,” असा आ. तांबे यांनी यावेळी सांगितले आहे.