अहिल्यानगर जिल्ह्यातील धरणे ओव्हरफ्लो

अहिल्यानगर (प्रतिनिधी)- अहिल्यानगर जिल्हा ( Ahilyanagar ) हा राज्यातील महत्त्वाचा कृषी व औद्योगिक पट्टा मानला जातो. जिल्ह्यात निळवंडे, भंडारदरा, मुळा, घोड यांसारखी मोठी धरणे असून, यांचा थेट संबंध शेतकऱ्यांच्या पिकांना आणि उद्योगांच्या पाणीपुरवठ्याला आहे. यंदा या धरणांमध्ये वेळेत झालेल्या दमदार पावसामुळे मुबलक जलसाठा उपलब्ध झाला आहे. ( ahilyanagar-dams-overflow-2025-nilwande-bhandardara-mula )

उन्हाळ्यात पाण्याची मागणी तुलनेने कमी असल्याने सिंचनासाठी राखून ठेवलेले पाणी धरणांमध्ये साठून राहिले. त्यातच पाणलोट क्षेत्रात झालेल्या पावसामुळे धरणांमध्ये अपेक्षेपेक्षा जलद भराव सुरू झाला. परिणामी, यंदा जिल्ह्यातील १२ धरण प्रकल्प भरले असून, ओव्हरफ्लो होऊ लागले आहेत. ( अहिल्यानगर जिल्ह्यातील धरणे ओव्हरफ्लो ) या जलसाठ्यामुळे रब्बी हंगामासाठीची भीती दूर झाली असून, उद्योगांनाही पुरेसा पाणीसाठा मिळणार आहे. विशेष म्हणजे, गतवर्षीच्या तुलनेत यंदा धरणे १५ दिवस आधीच पूर्ण क्षमतेला पोहोचली आहेत.

जिल्ह्यात १ जून ते ५ सप्टेंबर या कालावधीत सरासरी ३२५ मिमी पावसाची अपेक्षा असते. मात्र, यंदा आतापर्यंत २७३.६ मिमी पावसाची नोंद झाली असून, सरासरीपेक्षा ५२.१ मिमीने कमी पाऊस आहे. तरीदेखील धरणे वेगाने भरली आहेत. कारण लाभक्षेत्रात पाऊस कमी झाला असला तरी पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस पडत राहिला. विशेष म्हणजे, मे महिन्यात झालेल्या जवळपास २२० मिमी पावसामुळे धरणांमध्ये लवकर पाणी साचले आणि मागणीही कमी झाली.

मागील वर्षी सप्टेंबर २०२४ रोजी निळवंडे धरणात ९४ टक्के व मुळा धरणात ९६ टक्के जलसाठा होता. यावर्षी सप्टेंबर २०२५ रोजी निळवंडे, भंडारदरा व मुळा ही तीनही मोठी धरणे पूर्ण क्षमतेने भरली आहेत. जिल्ह्यातील एकूण ५५ हजार दशलक्ष घनफूट पाणी प्रकल्पांमध्ये साठले असून, भंडारदरा १०० टक्के, निळवंडे ९९.७१ टक्के, मुळा ९९.११ टक्के, आढळा १०० टक्के, मांडओहळ ९० टक्के, घोड १०० टक्के, सीना १०० टक्के, खैरी १०० टक्के, विसापूर ९९ टक्के, मुसळवाडी १०० टक्के व टाकळीभान १०० टक्के भरल्याची नोंद झाली आहे.

जिल्ह्यात सध्या एकूणच जलसाठ्याची परिस्थिती समाधानकारक असून, शेतकऱ्यांना रब्बी हंगामाची हमी तर मिळालीच आहे, त्याचबरोबर औद्योगिक विकासासाठीही पाण्याचा मुबलक पुरवठा होणार आहे.

Share post:

Leave a Comment