
संगमनेर ( प्रतिनिधी )- संगमनेर फेस्टिव्हलच्या कार्यक्रमामध्ये आ. अमोल खताळ सहभागी झाले होते. कार्यक्रम संपवून आमदार अमोल खताळ तिथून निघाल्यानंतर प्रसाद अप्पासाहेब गुंजाळ नावाच्या एका इसमाने मुख्य प्रवेशद्वाराजवळ आ. अमोल खताळ यांच्यावर हल्ला केला असल्याची माहिती मिळाली आहे. राजस्थान युवक मंडळ आयोजित संगमनेर फेस्टिव्हलच्या समारंभावेळी आमदार अमोल खताळ यांच्यावर हा हल्ला झाला. मालपाणी लॉन्स येथे झालेल्या कार्यक्रमात उपस्थित असताना, प्रेक्षकांशी हस्तांदोलन करताना खांडगाव येथील एका व्यक्तीने हात मिळवण्याच्या बहाण्याने आमदारांवर अचानक हल्ला केला.
या हल्ल्यामुळे घटनास्थळी मोठा गोंधळ निर्माण झाला होता. घटनास्थळी उपस्थितांनी हल्लेखोराला चोप दिल्याची माहिती पुढे आली आहे. पोलिसांनी हल्लेखोराला ताब्यात घेतले आहे. ह्या घटनेचा सर्वच स्तरातून निषेध होत आहे. तसेच ह्या घटनेनंतर आमदार अमोल खताळ यांनी सोशल मीडियावर व्हिडिओ पोस्ट करत कार्यकर्त्यांना शांत राहण्याचे आव्हान केले आहे.


गणेश उत्सव सुरू असल्यामुळे आज एका कार्यक्रमासाठी मी गेलो असता कार्यक्रम आवरल्यानंतर नंतर येत असताना एका व्यक्तीच्या हस्तकाने माझ्यावर जो भ्याड हल्ला केला त्या भ्याड हल्ल्यामुळे कार्यकर्त्यांनी कुठलाही उद्रेक न करता गणपतीचा उत्सव मोठ्या आनंदाने साजरा करायचा आहे. एका भ्याड हल्ल्याने आपण व्यथित होणार नाही आपण खचणार नाही परंतु आज हा जो गणपती उत्सव आहे ह्या उत्सवाला कुठल्याही प्रकारे गालबोट लागणार नाही याची सुद्धा आपल्याला काळजी घ्यायची आहे. संगमनेर शहर असेल तालुका असेल त्यातील सर्व माझ्यावरती प्रेम करणाऱ्या जनतेला, महायुतीच्या कार्यकर्त्यांना माजी विनंती आहे की कोणीही कुठल्याही प्रकारे शांतता भंग होणार नाही याची काळजी घ्यायची आहे. पोलीस प्रशासन तपास करतील त्यामध्ये जे कोणाचे हस्तक असतील तर त्यांच्यावरती सुद्धा आपला कायद्याच्या राज्यांमध्ये कठोर कारवाई केली जाईल.
– आमदार अमोल खताळ
आता नाशिक पदवीधारचे आमदार सत्यजित तांबे यांनीही आपल्या एक्स प्लॅटफॉर्मवरून ह्या हल्याचा निषेध व्यक्त केला आहे. यावेळी ते म्हणाले कि,

संगमनेर येथे माझे सहकारी, आमदार अमोल खताळ यांच्यावर झालेल्या हल्ल्याच्या प्रयत्नाचा मी तीव्र शब्दांत निषेध करतो. लोकप्रतिनिधीवर कोणत्याही कारणास्तव अशा प्रकारची घटना घडणे अत्यंत निंदनीय आहे. पोलिस प्रशासनाने या प्रकरणाची तातडीने सखोल आणि निपक्ष चौकशी करून संपूर्ण सत्य जनतेसमोर आणावे, ही अपेक्षा.
आ. सत्यजित तांबे
तसेच पालकमंत्री विखे पाटील यांनी या घटनेचा निषेध केला आहे, तसेच दोषींवर तात्काळ कारवाईचे आदेशही दिल्याचं त्यांनी सांगितले. ते म्हणाले की,

आमदार अमोल खताळ यांच्यावरील या भ्याड हल्ल्याचा मी निषेध करतो. हे हल्लेखोर कुणाचे पुरस्कृत आहेत का? याची माहिती घेऊन यासंदर्भात चौकशीचे आदेश मी पोलिसांना दिले आहेत. भ्याड हल्ला करून महायुतीच्या कार्यकर्त्यांचा आत्मविश्वास कमी होईल असा काही लोकांचा गैरसमज आहे. हा गैरसमज दूर करायला वेळ लागणार नाही, असा इशाराही त्यांनी राजकीय विरोधकांना दिला. काही लोकांना जर लोकशाही मान्य नसेल, ठोकशाहीच त्यांना मान्य असेल तर संगमनेर तालुक्यातील महायुतीचे कार्यकर्तेही त्याच भाषेत उत्तर देतील